परिचय

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांचा

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचं नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभं राहतं ते अतिशय विनयशील, सभ्य, सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाची ठळक ओळख निर्माण करणारं, संकटसमयी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून जाणारं, सर्वांशी मिळून मिसळून वागणारं, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणाईच्या ऊर्जेला विधायक वळण देणारं जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून भविष्याचा वेध घेणारं आश्वासक युवा नेतृत्व.

समाजकारणाचा आणि राजकारणाचा समृध्द वारसा लाभलेल्या कुटुंबात आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा १३ जानेवारी १९८१ रोजी जन्म झाला. राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांचे ते सुपुत्र आहेत. आ. डॉ. विश्वजीत कदम हे स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर असून त्यांनी ‘फायनान्स अँड मार्केटिंग’ या विषयात एम.बी.ए. पूर्ण केले आहे. त्यांनी ‘मॅनेजमेंट’ या विषयात पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. आ. डॉ. विश्वजीत कदम ऊर्फ बाळासाहेब हे कॉंग्रेसचे तरुण, तडफदार व धडाडीचे नेते असून, आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी जनमानसात कॉंग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. स्व. डॉ.पतंगराव कदमसाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवत ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, कला, क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजकारण करण्याकडे त्यांचा कल असतो. ते भारती‌‌ विद्यापीठाचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ६२ हजारांहून अधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अडीच वर्षे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जनहिताचे अनेक निर्णय घेतले, विविध लोककल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. २०१९ मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य करून पूरग्रस्तांना दिलासा दिला. महापुराच्या काळातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी भाजपाचा धुव्वा उडवून आपला गड अबाधित ठेवला. राजकारण करताना त्यांनी कधीही नैतिक मूल्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विसर पडू दिला नाही. वर्चस्वाचे नाही तर विकासाचे राजकारण केले. गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी केले. आजही ते स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्याप्रमाणे सदैव लोकांच्या मदतीसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात.

आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवलेले धडाडीचे लोकनेते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास...

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून माननीय डॉ. विश्वजीत कदम यांचा हॅट्रिक विजय!

नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय हॅट्रिक विजय मिळवला. त्यांनी ३०,०६४ मतांच्या फरकाने विजय मिळवला, भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आणि मतदारसंघाचा विश्वास संपादन केला.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मतांनी विजयी होण्याचा विक्रम

डॉ. विश्वजीत कदम यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ एवढ्या प्रचंड मतांनी विजयी होण्याचा विक्रम स्थापित केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार म्हणून बिनविरोध निवड

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड

२०१४ साली त्यांची पुन्हा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमतांनी निवड करण्यात आली. ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने, मोर्चे, उपोषण, सभा यांच्या माध्यमातून सामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचे काम सातत्याने केले. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध कृती कार्यक्रम राबविले.

बुलढाणा ते सांगली अशी ५३२ कि. मी. ची पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडली

२०१३ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किलोमीटरची पदयात्रा काढली. राज्यातील नऊ दुष्काळी जिल्ह्यांतून गेलेली ही पदयात्रा लक्षवेधी ठरली. या पद्यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणजे ‘जनतेच्या प्रश्नांसाठी ताकदीने लढणारा युवा नेता’, अशी ओळख सबंध राज्यभर निर्माण झाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची भूमिका हिरीरीने मांडून प्रचाराची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली

२०१२ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभागी होऊन कॉंग्रेसची भूमिका मांडली. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रचंड मतांनी निवड

२०११ साली ते महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रचंड मतांनी निवडून आले. या काळात त्यांनी राज्यभर दौरे करून पक्ष बांधणीसाठी मोलाचे कार्य केले. तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले. युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली.

प्रदेश युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

२००८ मध्ये प्रदेश युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. राज्यात ठिकठिकाणी दौरे करून कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून युवकांना मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

सन २००७ मध्ये कॉंग्रेस नेतृत्वाने डॉ. विश्वजीत कदम यांच्या धडाकेबाज कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड केली. त्यांनी या संधीचे सोने करत राज्यभर युवक कॉंग्रेसचे संघटन मजबूत केले. त्यांनी पक्ष बांधणीसाठी मोलाचे योगदान दिले

वयाच्या १८ व्या वर्षी राजकारणात प्रवेश

१९९९ मध्ये आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी वयाच्या १८ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाचा कृतिशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी पलूस, कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरुणांचे संघटन उभारून कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

वारसा लोकसेवेचा

आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सामाजिक, शिक्षण, राजकीय, सहकार आणि क्रीडा या क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. तरुण वयात मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या रक्तातच समाजसेवेचा वसा आहे. त्यांनी त्यांचे वडील स्व. डॉ. पतंगराव कदमसाहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश केला. स्व. डॉ. पतंगराव कदमसाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी खर्ची घातले, त्यांनी राजकारण व समाजकारण यांचा सुंदर समतोल साधला होता. आ. डॉ. विश्वजीत कदम यांनीदेखील वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत स्वत:ला जनसेवेसाठी वाहून घेतले आहे. कदम कुटुंबाची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ आणि विश्वासार्हता त्यांनी आपल्या कामगिरीतून कायम ठेवली आहे. समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या हिताचे प्रश्न सोडवून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर बनविण्यासाठी ते अखंड कार्यरत असतात.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top