जनसेवेसाठी सदैव अग्रभागी आ. डॉ. विश्वजीत कदम

‘माणुसकी ही जात आणि मानवता हाच खरा धर्म’ हाच विचार घेऊन आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी आपले वडील स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा पुढे चालवत स्वत:ला जनसेवेसाठी वाहून घेतले आहे. संकटसमयी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने सदैव लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता, अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. पलूस, कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारखे अस्मानी संकट कोसळले, त्या त्यावेळी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आ. डॉ. विश्वजीत कदम व त्यांच्या कुटुंबीयांनी आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून सेवाभाव जपला. समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी नैसर्गिक संकटाच्या काळात नागरिकांना मोठा आधार दिला. सत्वपरीक्षा घेणाऱ्या पूर परिस्थितीत व कोरोना महामारीच्या संकटकाळात त्यांच्यातील हळव्या, संवेदनशील व खंबीर सहृदयी नेत्याचे दर्शन सर्वांनाच घडले. आनंदाचा प्रसंग असो की, दु:खद घटना असो, आ. डॉ. विश्वजीत कदम हे नेहमी लोकांसोबत असल्याचे दिसून येते. आपण जनतेचे सेवक आहोत, याची पूर्ण जाण ठेवून ते लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिला आहे. ‘बोले तैसा चाले….’ या उक्तीप्रमाणे त्यांची कार्यपद्धती आहे.
सन २००५, २०१९ व २०२१ मध्ये सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांतील जनतेने प्रलयंकारी महापुराचा कटू अनुभव घेतला आहे. सन २०१९ मध्ये ऑगस्ट महिन्यात कृष्णा, वारणा नदीला आलेल्या भीषण पुराचा पलूस व कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्याला जबरदस्त तडाखा बसला. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. शेकडो गावे जलमय झाली. अनेकांना प्राण गमवावे लागले. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. निसर्गाच्या प्रकोपाने शेती व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली. या अस्मानी संकटाच्या काळात आ. डॉ. विश्वजीत कदम हे देवासारखे लोकांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. महापुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांना भारती विद्यापीठाच्या शाळांमध्ये हलवून त्यांची निवास, भोजन, कपडे, औषधोपचाराची व्यवस्था त्यांनी केली. तसेच जनावरांसाठी छावण्यांची व चाऱ्याची व्यवस्थाही केली. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ते एखाद्या योद्ध्यासारखे अहोरात्र झटत होते. महापूर ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये म्हणून त्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. भारती हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांचे लसीकरण व आजारी नागरिकांवर उपचार केले. शासनाकडून पूरग्रस्तांना जास्तीतजास्त मदत मिळावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नैसर्गिक संकटाच्या काळात ते लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
सन २०२१ मध्ये पुन्हा पलूस, कडेगाव तालुक्यावर महापुराचे संकट कोसळले. तेव्हा आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या पायाला जखम झालेली असतानाही स्वत: कंबरेएवढ्या पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पूरग्रस्तांनी हाक देताच ते मदतीसाठी तात्काळ धावून गेले. प्रशासनाशी समन्वय साधून युद्धपातळीवर बचावकार्य करून अनेकांना त्यांनी जीवदान दिले. महापुराची झळ बसलेल्या नागरिकांसाठी निवास, भोजनाची तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांची व्यवस्था केली. भारती विद्यापीठाच्या वतीने ‘डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी’ च्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारची मदत करून त्यांची जगण्याची उमेद वाढवली. सन २०२० मध्ये भारतासह संपूर्ण जगात कोरोना (कोव्हिड-१९) महामारीने धुमाकूळ घातला असताना आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी ‘कोरोना योद्ध्या’ ची भूमिका निभावत हजारो नागरिकांना जीवनदान दिले. या काळात ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे लोकांसाठी अहोरात्र झटत होते. कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार, औषधी, जेवण पुरविण्याबरोबर ‘रेमडेसिव्हिर’ हे महागडे इंजेक्शन स्वखर्चाने उपलब्ध करून देत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी मोफत जेवण, अन्नधान्य, किराणा साहित्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांच्या प्रवासखर्चाची व भोजनाची व्यवस्था केली. याच काळात शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके तसेच त्यांचा शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. संकटाच्या वेळी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करण्याच्या आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top